*प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन…*
(अकलूज)
कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात लौकिक प्राप्त केलेल्या शंकरनगर येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने दिनांक 22, 23 व 24 डिसेंबर 2024 या कालावधीत शालेय मुला-मुलींच्या राज्यस्तरीय समुहनृत्य स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी दिली.
शालेय मुला मुलींच्या सुप्त कलागुणांना चालना देऊन ते भावी जीवनात यशस्वी कलाकार बनावेत या उद्देशाने सहकार महषिॅ शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी या समुहनृत्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. प्रताप क्रीडा मंडळाने अनेक नामवंत कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, नृत्य कलाकार निर्माण केले असून आज ते विविध माध्यमातून कार्यरत असून नावलौकिक प्राप्त करीत आहेत. प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपारांणी मोहिते पाटील, चि.सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धा संपन्न होत आहेत.
सहकार महषिॅ शंकरराव मोहिते पाटील स्मृतीभवन शंकरनगरच्या बादशाही रंगमंचावर होणाऱ्या या स्पर्धेसाठी एकूण पाच गट असून दिनांक 22 रोजी सकाळ सत्रात गट पहिला इयत्ता 1 ते 4 थी (कॅसेट गीत), दुपार सत्रात गट दुसरा इयत्ता 5 वी ते 7 वी ग्रामीण व शहरी कॅसेट गीत (पारंपारिक लोकनृत्य), दिनांक 23 रोजी सकाळ सत्रात गट तिसरा इयत्ता 8 वी ते 10 वी ग्रामीण (बॉलीवूड डान्स), व दुपार सत्रात गट 8 वी ते 10 वी कॅसेट गीत शहरी (पाश्चिमात्य), दिनांक 24 रोजी दुपार सत्रात गट चौथा इयत्ता 5 वी ते 10 वी कॅसेट गीत (प्रासंगिक नृत्य संवाद थीम डान्स), व सकाळ सत्रात गट पाचवा इयत्ता 11वी ते सर्व महाविद्यालयीन गट (प्रासंगिक नृत्य थीम डान्स) या गटांचे सादरीकरण होणार आहे .
प्रत्येक गटास रोख रकमेची पारितोषिके, प्रमाणपत्र, यासह शहरी व ग्रामीण गटास स्वतंत्र सर्वसाधारण विजेतेपद व फिरते चषक देण्यात येणार आहे.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, सचिव बिभीषण जाधव, स्पर्धा प्रमुख मुख्याध्यापक संजय गळीतकर, डॉ. विश्वनाथ आवड, दिलीप शिर्के, नामदेव काळे प्रमुख उपस्थित होते.